SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा.. माजी पोलीस आयुक्तांचे आरोप भोवले

मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर पोलिसांना २०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिल्याचा आरोप केला होता. हा आरोप भोवल्याने अखेर देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी ऍड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने हा मुद्दा उचलून धरत गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आघाडी सरकारवर दबाव आणला. न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल देशमुख यांची पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली. त्यात गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्यास शरद पवार यांनी हिरवा कंदील दिल्यावर गृहमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

ऍड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात गृहमंत्री देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते, की देशमुख गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. सीबीआय संचालकांनी याप्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी. त्यात गुन्हा आढळून आल्यास फिर्याद दाखल करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण?

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात थेट गृहमंत्री देशमुख यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री देशमुख यांनी दरमहा २०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट वा अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याचीही सूचना केली होती.

Advertisement

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत – फडणवीस

दरम्यान, याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सीबीआय चौकशी लागल्याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले, तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल.

Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना फडणवीस म्हणाले, की हफ्ते वसुलीचे काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. सीबीआय चौकशीत सगळं समोर येईल. सीबीआय चौकशी होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला यांचा अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्रच कसं खोटं आहे, हेही भासवण्याचा प्रयत्न केला.

कोण होऊ शकतं नवे गृहमंत्री?

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणारे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement