देशात कोरोना एवढा वेगाने पसरत असल्याने रुग्ण वाढत आहे आणि हे संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी आज सोमवारी समोर आली आहे. देशात कोरोनानं सध्या पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या प्रचंड संख्येने विक्रमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच 16 सप्टेंबर 2020 रोजीपासून भारतात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद आज झाली होती. रुग्णसंख्येचा तेव्हाचा विक्रम सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीने मोडीत काढला असून, गेल्या 24 तासांत देशात 1 लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांत आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे.
रविवारी दिवसभरात देशात 1 लाख 3 हजार 558 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 हजार 847 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या 24 तासांच्या कालावधीत देशात 478 म्हणजे जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक 97 हजार 894 रुग्ण आढळून आले होते. 16 सप्टेंबर 2020 रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात करोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच लागण होत असल्याचं दिसून आलं आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या :
देशात रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात 4 एप्रिल रोजी तब्बल 57 हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात 57 हजार 74 नवीन करोनाबाधित आढळले असून, 222 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर 1.86 टक्के असून, आतापर्यंत 55 हजार 878 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 4, 30,503 रुग्ण उपचार घेत आहेत.