नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची दुसरी लाट मोठ्या वेगाने आपले पाय पसरत आहे. भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असली, तरी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच आहे. दुसरीकडे लस आल्यापासून कोरोना संपला, असे समजून अनेक जण त्यावरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यातून देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. असे असताना अजूनही कोणी कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाही.. मग ती आरोग्य यंत्रणा असो वा सर्वसामान्य नागरिक.. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा असाच एक प्रताप उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे समोर आला..
त्याचे घडले असे..
कानपूर देहात येथील मडौली पीएचसीमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे. तेथील कमलेश देवी नावाची एक महिला या केंद्रावर लसीकरणासाठी गेली होती.. त्यावेळी तेथील एएनएम (ऑक्सिलरी नर्स मिडवायफरी), म्हणजेच आरोग्य सेविका मोबाईलवर बोलण्यात तल्लीन झाली होती. मोबाईलवर संवाद साधत असतानाच, तिने या महिलेला चक्क दोनदा कोरोनाची लस दिली. ही बाब कमलेश देवी यांनी लक्षात आणून दिल्यावर तिच्या कुटुंबीयांनी केंद्रावर एकच गोंधळ घातला. याबाबत महिलेने तक्रार केल्यानंतर संबंधित आरोग्यसेविकेनेही आपली चूक कबूल केली.
याबाबत माध्यमांशी बोलताना कमलेश देवी म्हणाल्या, ”केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता, संबंधित आरोग्यसेविका मोबाईलवर बोलत होती.. मोबाईलवर बोलत असतानाच, तिने आपणास कोरोना लस दिली. त्यानंतरही मी तिथेच बसून होते. तिनेही मला तेथून उठण्यास सांगितले नाही.
काही वेळाने तिने मला पुन्हा लस दिली. याबाबत विचारणा केली असता, संबंधित आरोग्यसेविका उलट माझ्यावरच ओरडू लागली. लस दिल्यानंतर तू इथून उठली का नाहीस, असा सवाल करू लागली.. त्यावर तुम्हीच मला जाण्यास सांगितले नाही, लस किती वेळा घ्यायची, याबाबत मला काहीही माहिती नव्हती, असे मी सांगितले.”
हात टम्म सुजला
दरम्यान, दोन लशी घेतल्याचा परिणाम लगेच दिसून आला.. कमलेश देवी यांचा हात टम्म सुजला होता. याबाबत माहिती मिळताच, कमलेश देवी यांच्या कुटुंबीयांनी केंद्रावर एकच गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळातच तिथे अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले.
त्यांनी संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. कानपूर देहातचे सीएमओ राजेश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, त्याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत..
पथकाला चौकशीचा आदेश
दरम्यान, कमलेश देवी यांना दोन वेळा लस दिल्याने ‘ओव्हर डोस’ झाल्याने त्यांचा हात सुजला आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. सीएमओ राजेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीला दोन वेळा लस दिली जात नाही. हे शक्य नाही. याबाबत नेमलेल्या पथकाला चौकशीचा आदेश दिला आहे.
त्यांचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.. मात्र, आरोग्य यंत्रणेचा हा मोठा हलगर्जीपणा असून, तो एखाद्याच्या जिवावरही बेतू शकतो, असे कमलेश देवी यांच्या मुलाने माध्यमांशी बोलताना सांगितले..