मुंबई : आयपीएलचा (IPL 2021) थरार आठवडाभरानंतर सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royals Challengers Bangalore) यांच्यात उदघाटनाचा सामना रंगणार आहे. आयपीएल सामन्यात सगळ्यात उत्सुकता कसली असेल तर ती असते षटकार-चौकारांच्या आतषबाजीची. एखादा सामना लो स्कोरिंग झाला तर तो प्रेक्षकांना आवडत नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये पाच फलंदाजांवर लक्ष लागले आहे. त्यात भारतीय सर्वाधिक आङेत.
विराट कोहली
सर्वात वरच्या ओळीत आहे तो भारतीय कर्णधार. होय, तो आपला विरू. अहो, विराट कोहली हो. सन 2008 पासून त्याच्या धावांची भूक काही संपलेली नाही. हे मान्य आहे की त्याचा स्वतःचा रॉयल चॅलेंजर बेंगलुरूचा संघ आयपीएलचा किताब मिळवू शकला नाही. असे असले तरी तो जखमी वाघ आहे आणि कधीही उसळून येऊ शकतो. मागील 15 मॅचमध्ये 42.36 सरासरीने 466 धावा जमवल्या आहेत. या खेळीत त्याची तीन अर्धशतकं आहेत.
एम एस धोनी
धोनी है तो सब होनी है…असं गंमतीनं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एम. एस. धोनी आता निवृत्त झालाय, त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त ताण नाही. चेन्नईला त्याने नेहमीच वरच्या स्थानावर ठेवलं आहे. भलेही मागच्या सिझनमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल परंतु त्याचा आत्मविश्वास तगडा आहे. पुढच्या सिझनविषयी माहिती नाही, परंतु या हंगाम त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
रिषभ पंत
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणजे रिषभ पंत. त्याला डावखुरा सेहवाग काहीजण समजतात. तो असे काही खेळतो की सामन्याचा नूरच पालटून टाकतो. सगळ्यांचे लक्ष त्याच्या फलंदाजीवर असतं. त्याने फटकावलेला चेंडू सीमारेषेबाहेर जातोच. श्रेयस अय्यर जखमी असल्याने दिल्लीने कर्णधारपदाची धुरा पंतच्या खांद्यावर सोपवली आहे. पंतने मागील मोसमात 14 मॅचमध्ये 343 धावा केल्या आहेत.
के. एल. राहुल
किंग्स इलेव्हन पंजाबला जेतेपदाचा करंडक मिळवून देण्यासाठी के. एल. राहुल प्रयत्न करताना दिसतो. यंदा हे जेतेपद मिळवायचेच असे त्याचे ध्येय आहे.मागील हंगामातील त्याचा रेकॉर्ड पाहिला तर 14 मॅचमध्ये 670 ठोकल्यात. ज्यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके आहेत. मागील सिझनमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
रोहित शर्मा
आयपीएलच्या 14 व्या मोसमातही मुंबईकडे कप राहिला पाहिजे, यासाठी रोहित शर्माचा भर असेल. तो आपल्या टीमसाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसतो. सर्वाधिक आयपीएलचा कोण दावेदार असतो तर तो म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहितने मागील 12 मॅचमध्ये 332 रन्स केले आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. यावेळी जास्तीत जास्त रन्स करुन सहाव्यांदा आयपीएलचा करंडक जिंकण्याचा त्याची इच्छा आहे.