SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

संजय राऊतांच्या ‘त्या’ रोखठोक विधानाचा अजित दादांकडून समाचार.. म्हणाले, कुणी ‘मिठाचा खडा टाकू नये’!

मुंबई : सचिन वाझे प्रकरण महाविकास आघाडीच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजप नेत्यांनी विधिमंडळात शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मुंबईचे आयुक्त परमबीर सिंग यांनीच वाझे यांना जास्तीची मुभा दिली. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यावर लेटरबॉम्ब टाकला. शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिलं होतं, असं पत्र मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवल्याचं सांगितलं जातं.

या प्रकरणात राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेतही तूतू मैंमैं सुरू झाली आहे. शिवसेनेनेही राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांवर सामना या मुखपत्रातून टीकास्त्र सोडले आहे. त्यातूनच धुसफूस सुरू झाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे मातब्बर मंत्री अजित पवार यांनी राऊत यांना इशारा दिला आहे. या सुंदोपसुंदीमुळे आघाडीत बिघाडी सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी हे पद नाकारले. तेव्हा देशमुखांकडे ऐनवेळी हे पद सोपवले. राऊत यांचे हे मत राष्ट्रवादीला मान्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या मताचा समाचार घेतला आहे.

अजित दादा म्हणतात, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कोणाला मंत्री करायचे, हा त्या-त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकारचं काम व्यवस्थित चालू आहे. चांगलं चाललेलं असताना बाहेरच्यांनी मिठाचा खडा टाकू नये.

Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. पक्षातील निर्णय तेच घेतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. काँग्रेसमध्येही तसंच आहे. हे सरकार व्यवस्थित काम करीत आहे. असे असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये, असे सांगत अजितदादांनी सूचक इशारा दिला आहे. काहीजण म्हणतात, बिघाडी व्हायला लागली आहे महाविकास आघाडीची.

सामना या वर्तमानपत्रात संजय राऊत यांचे रोखठोक हे सदर आहे. त्यात ते लिहितात, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. आबांच्या ताब्यात हे पद असताना त्यांनी चांगले काम केले.

Advertisement

राऊत पुढे लिहितात, देशमुखांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?

राऊत यांनी अशा पद्धतीने देशमुख यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतल्याने हे राष्ट्रवादीला रूचले नाही. त्यामुळे त्यांच्या गोटातून थेट अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. उगाच मिठाचा खडा टाकून दूध नासू नका. म्हणजेच कारण नसताना प्रतिक्रिया दिल्यास महाविकास आघाडीचा गाडा रूतेल, असेच जणू उपमुख्यमंत्र्यांना सूचवायचे आहे.

Advertisement