एका रात्रीत श्रीमंती मिळते या गोष्टी आपण पुस्तकातून किंवा आजी-आजोबांच्या तोंडून ऐकल्या होत्या. परंतु हे वास्तवात घडलंय. भलेही देश दुसरा असेल. मात्र, कथा इंटरेस्टिंग आहे. आपल्या शेजारील थायलंड नावाचा एक देश आहे. तेथेही आपल्या देशासारखेच गरीब लोक आहेत.
आपण समुद्रातील मासे वगैरे खातो, त्यांचं जरा वेगळं असतं. ते लोकं गोगलगाय खातात. हे ऐकून जरा किळसवाणं वाटेल, पण ते खरंय. आपण तर ऐकलंय की चीनी लोकं बेडूक खातात, त्याचं लोणचंही असतं म्हणे. आपल्याला वाचून, ऐकून कसंतरी वाटतं. ते कसं खात असतील देव जाणे.
तर मूळ गोष्ट अशी आहे, थायलंडमधील एक महिला भाजीसाठी गोगलगाय आणायला गेली. आपण कसे रविवारी मटण आणायला मार्केटमध्ये जातो, अगदी तसंच. ती दुकानावर गेली आणि 163 रुपयांच्या समुद्री गोगलगाय विकत आणल्या. त्या ती साफसूफ करीत होती. त्यानंतर धुण्याचा कार्यक्रम सुरू होता.
….आणि मग ‘असं’ काही घडलं
गोगलगाय चिरताना तिच्या पोटात केसरी रंगाचा खडा आढळला. तिला वाटले खडकाचा तुकडा असेल. त्या महिलेचे नंतर कुतूहल जागे झाले. तिने इकडे तिकडे विचारपूस सुरू केली. त्यावेळी तिला सांगितलं गेलं की हा दगड नाही. दुर्मिळ प्रकारचा 6 ग्रॅम वजनाचा मोती आहे. तो मोती 1.5 सेमी व्यासाचा आहे. त्याची बाजारातील किंमत ऐकून तिचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
मोती अनेक रंगछटांमध्ये सापडतो. मात्र, त्यातील केसरी/नारंगी रंगाचा मोती सर्वात जास्त महागडा आणि दुर्मिळ मानला जातो. बाजारात या मोत्याला कोट्यवधी रूपये मिळतात.
कोट्यावधी रूपयांचा मोती आपल्याजवळ आहे. म्हणल्यावर ती बाई हुरळून गेली. परंतु तिला भीती वाटायची. आपण जर ही माहिती सगळीकडे सांगितली तर मासेवाला तो मोती माझाच आहे, असे म्हणेल. त्यामुळे तिने कोणालाच ही माहिती सांगितली नाही. एकेदिवशी तिच्या वडिलांचा अपघात झाला. आईलाही कॅन्सर झाला. त्यामुळे तिला हे सिक्रेट फोडावं लागलं. तिने जाहीर केलंय की जो सर्वात चांगली किंमत देईल, त्याला हा मोती मी विकेन. त्या मोत्यासाठी श्रीमंतांच्या उड्या पडल्यात. तुमच्या-आमच्याही बाबतीत असं घडू शकतं, तेव्हा शहानिशा केल्याशिवाय कुठलीही गोष्टी फेकून द्यायची नाही.