SpreadIt News | Digital Newspaper

“मी जिंकलो तर तुम्हाला चंद्रावर नेईन, आयफोन, हेलिकॉप्टर, कार देईन”, 3 मजली इमारतही बांधून देईल; निवडणुकीसाठी अजब उमेदवाराचा गजब जाहीरनामा

0

देशात तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगताना अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. अनेक जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांचा उल्लेख आहे. एक ना एक योजनेत सर्व काही मोठ्या मोठ्या गोष्टींचा भरणा आहे. आपल्या विचाराच्या पलीकडेही जाऊन या योजना आहेत. असंच एक जगावेगळं उदाहरण तामिळनाडूत आपल्याला पाहायला मिळेल.

चर्चा त्या जाहिरनाम्याची…

Advertisement

तामिळनाडूमध्ये एक उमेदवार प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये तोंडात बोट घालायला भाग पाडणारे आश्वासनं दिली आहेत.

आश्वासनं द्यावी म्हणजे ती पूर्ण करता आली पाहिजेत, किंबहुना असंही म्हणता येईल की प्रयत्न करून ती अपूर्ण राहिली व पूर्ण करता येण्याजोगी शिल्लक राहिली. पण येथे हा कारनामा जरा वेगळा आहे. या उमेदवाराने चक्क आयफोन, हेलिकॉप्टर इतकच काय तर चंद्रावर सहल नेण्याचंही आश्वासन दिलं आहे.

Advertisement

होय! दक्षिण मदुराई मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वनान या 34 वर्षीय उमेदवाराचा जाहीरनामा सध्या फार चर्चेत आला आहे. या सर्वनानने जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, रोबोट होडी आणि घरात वापराच्या अनेक वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे.

आपल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं सर्वनान सांगतो. त्याने म्हटलंय की, ‘मी जिंकल्यास मतदारसंघामधील प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देईलच पण प्रत्येक घरातील एका व्यक्तीच्या नावे 3 मजल्याचे घरही बांधून देईन. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल,’ असा दावा सर्वनानने केला आहे.

Advertisement

तसेच तरुणांसाठी एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर 100 दिवसांसाठी सहल घेऊन जाईन अशा शब्दही सर्वनानने आपल्या मतदारांना दिलाय.

प्रत्येक घरासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूंबरोबरच, सर्वजनिक उपक्रम, मोठे प्रकल्प, अवकाश संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट, मतदारसंघामध्ये उन्हाळ्याचा अनेकांना त्रास होत असल्याने 300 फूट उंचीचा कृत्रिम हिमकडा उभारण्याचंही आश्वासन दिलं आहे.

Advertisement

“मागील 50 वर्षांपासून राजकीय पक्ष लोकहिताच्या योजनांचं आश्वासनं देत निवडणुका जिंकत आहेत. त्यांनी सत्तेत आल्यानंतर कधीच लोकांची सेवा केली नाही. याचसंदर्भात जागृती करण्यासाठी मी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जो यापूर्वी जगात कोणीच केला नव्हता,” असं त्याने सांगितलं.

“निवडणूक लढवण्यासाठी मी 20 हजारांचे कर्ज काढलं आहे. त्यापैकी 10 हजार रुपये मी अर्ज भरताना खर्च झालेत. दक्षिण मदुराईमध्ये दोन लाख 30 हजार मतदार आहेत. जर 50 तरुण निवडणुकीला उभे राहिले आणि प्रत्येकाने 50 मतं जरी मिळवली तरी कोणत्याच पक्षाला तामिळनाडूमध्ये विजय मिळवता येणार नाही. ते लोकांना घाबरतील. मी याचसंदर्भातील जागृती करण्यासाठी निवडणूक लढवत आहे,” असं सर्वनाने स्पष्ट केलं आहे.

Advertisement

अनेकांनी सर्वनानचा हा जाहीरनामा उहासात्मक पद्धतीने बनवण्यात आला असल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे. वाटेल ती आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना चिमटा काढण्यासाठी सर्वनानने हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं बोललं जात आहे. अनेकदा निवडणुका जिंकून झाल्यावर नेते त्यांची आश्वासन विसरतात म्हणूनच ते निवडणुकीत वाटेल ती आश्वासनं देतात हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वनानने केल्याचं काहींना वाटत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement