SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू; कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवी रणनीती!

महाराष्ट्रात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता गर्दी टाळावी आणि संसर्गाला रोखता यावे म्हणून कडक उपाय योजना लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्चित केले आहे. त्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे नाइलाजास्तव गरजेचे झालेले असताना संपूर्ण राज्यात रविवारी म्हणजेच 28 मार्च 2021 पासून रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. त्याचबरोबर जमाव बंदी लावण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत आणि पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “लॉकडाउन लावायची अजिबात माझी इच्छा नसताना वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हा निर्णय घेणे गरजेचे झाले. ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर राज्यभर उभारणी केली, त्या सुविधा ही कमी पडतील की काय अशी शक्यता आता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स, आणि औषधांची उपलब्धता आणि त्यात वाढ कशी करायची याकडे लक्ष केंद्रित करावे असे देखील त्यांनी सांगितले.”

Advertisement

ब्रिटन सारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर पूर्वस्थितीवर सगळी परिस्थिती आली. आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. धोका टळलेला नाही तर तो अधिक वाढला आहे. आणि हे जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे.

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना येत्या काळात ती किती वाढेल हे सांगता देखील येत नाही. त्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जर एखाद्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तसा निर्णय आवश्यक घ्यावा. मात्र त्या आधी लोकांना पूर्व कल्पना द्यावी असेही त्यांनी सांगितले. अजूनही, जनतेने कोविडचे नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काळात देखील अधिक कठोर निर्बंध लावावे लागणार आहेत आणि हे जनतेने लक्षात घ्यावे असेही आवाहन त्यांनी केले.

Advertisement

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आपण बेड्स, आरोग्य सुविधा, जरूर वाढवू शकतो मात्र, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार हा मोठा प्रश्न आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काटेकोरपणे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. प्रशासनातील लोकांनी देखील आदेश पाळले जात आहेत की नाही याची काटेकोर पाहणी करावी.”

मॉल्स, बार, हॉटेल, सिनेमागृहाठिकाणी घालून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर मॉल्स रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद ठेवावेत आणि ते बंदच राहतील याबाबत खात्री करून घ्यावी.

Advertisement

सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर या आधी घातलेली बंधने देखील तशीच राहतील आणि ते पाळण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर राज्यात लसीकरणाचा वेग अजून वाढवावा लागणार आहे. त्यादृष्टीने देखील लवकरात लवकर पावले उचला असेही त्यांनी सांगितले.

Advertisement