अहमदनगर, (दिनांक 25 मार्च 2021) : नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात आज सायंकाळी भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे पुणे जिल्ह्यालाही जाणवले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा साडेचार वाजता भुकंपाचे धक्के बसले. या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात.
आज सायंकाळी साडेचार वाजता हे धक्के बसले. हा कमी तीव्रतेचा धक्का असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सन 2018 साली ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तीन दिवस हे धक्के बसत होते. त्यावेळी प्रशासनही घाबरले होते. तेव्हापासून येथे कोणतेही धक्के जाणवले नव्हते.
नाशिक येथे मेरी ही संशोधन संस्था आहे. त्या केंद्रापासून 76 किलोमीटर अंतरावर या धक्क्याचे केंद्र आहे. हा धक्का 84 सेकंदाचा व 2.6 रिश्टर स्केलचा होता. या धक्क्याचा परिणाम पठार भागातील बोटा, घारगाव, अकलापूर, कुरकुटवाडी, आभाळवाडी, बोरबन, म्हसवंडी, येलखोप, माळवाडी, केळेवाडी आदी गावांत जाणवला. पुणे जिल्ह्यातही आळेफाटा भागात या भूकंपाचे धक्के जाणवले, असं तेथील नागरिकांनी सांगितले.
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी मेरी संस्थेकडे संपर्क करून नेमके हे धक्के भूकंपाचे होते की आणखी कसले. त्याबाबत मेरीनेही दुजोरी दिला आहे. जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.