SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रात आता नवा वाद समोर, द आंत्रप्रेन्यूअर’चे लेखक शरद तांदळें यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काही महाराजांचा आक्षेप!

महाराष्ट्रात काही दिवसापासून वाद चिघळला आहे. प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. तसेच शरद तांदळे यांनी आपली वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

शरद तांदळे यांचे वारकरी संप्रदायातील हे भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात खूप लोक या वक्तव्यांवर टीका करत आहेत, तर काही लोक असं म्हणत आहेत की, तशी अनेक उदाहरणं वारकरी संप्रदायात आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायातील अशा लोकांनी स्वतःच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे ते लोक म्हणतात.

Advertisement

शरद तांदळे नेमकं काय म्हणालेत ?

उद्योजक शरद तांदळे म्हणाले, “खेड्यात पाच-पंचवीस लोकं एकदा बाबा म्हणून पाया पडले की अख्ख गाव पाया पडतं. त्याला खूप हुशार असण्याची गरज नाही. खूपच काही झालं तर शेवटी म्हणायचं ‘हरे राम किंवा हरे कृष्णा’ असं म्हटलं की संपलं. त्यापुढे जाऊन ‘बोला पुंडलीक वरदे..’ म्हणायचं, सगळे लोक म्हणतात याला लईच कळतंय. शेवटी हरीपाठातील एखादा डायलॉग पाठ करायचा. हा धंदा लई सोपा आहे. हरिपाठ खूप सोपा धंदा आहे. मी असे काही बिझनेस आधी शोधत होतो.”

Advertisement

कीर्तनासाठी 5-5 लाख रुपये मिळतात ?

“खेडे गावांमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचे कार्यक्रम खूप प्रमाणात चालतात. आपल्याकडे व्याख्यानं आता आता होत आहेत, तेही काही अंशी होतात. तर दुसरीकडं तुम्ही किर्तन म्हणा वा पारायण म्हणा, अख्ख गाव उभं असतं आणि यात त्यांना 5-5 लाख रुपये मिळतात, म्हणजे विचार करा की हा धंदा काही अवघड नाही. याशिवाय आळंदीत यांच्या संस्था आहेत. तिथं महाराज बनतात, मला हे नंतर कळालं. याचीही एक शाखा घ्या असं मी म्हटलं होतं. जनताच तशी झाल्यावर काय करावं. महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आलीय. यात खूप पैसा आहे, कारण 80 टक्के जनता आपल्यासारखी मूर्ख, बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणं हे दोन्ही धंदे खूप चांगले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

शरद तांदळेच्या वक्तव्यावर नेमका आक्षेप कोणता ?

ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांनी आक्षेप घेताना म्हटलं की, “शरद तांदळे यांच्यकडून त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत वारकरी संप्रदायाविषयी वाईट शब्द वापरले गेले आहेत. मान्य आहे की, ते उद्योजक आहेत, उत्तम लेखक आहेत. मी देखील त्यांचं ‘द आंत्रप्रेन्यूअर’ हे पुस्तक वाचलं आणि ते वाचून मला खूप छान वाटलं, पण पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदाय, संतविचार यांच्यामुळे ओळखला जातो. कीर्तनकार, वारकरी संप्रदाय, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था यांबद्दल त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्याचा मी निषेध करतो. तसेच, त्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी.”

Advertisement

शरद तांदळे यांनी आक्षेपार्ह विधाने केली ?

वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि वारकरी दर्पण या वारकरी संप्रदायाच्या मुखपत्राचे संपादक सचिन पाटील म्हणाले, “माझे मित्र शरद तांदळे यांनी वारकरी कीर्तनकारांबद्दल, संप्रदायाबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ह.भ.प. पुरूषोत्तमदादा पाटील यांनी केलेल्या पोस्टमुळे मला शरद तांदळे यांची ही विधाने समजली. मी शरद तांदळेंना फोन केला व त्यांच्या चुक लक्षात आणून दिली. त्यांनी दुपारी 1 वाजता चूक मान्य केली खरी आणि दिलगीरी व्यक्त करणारी पोस्ट तातडीने करतो, असा शब्दही त्यांनी दिला. पण झालं असं की, रात्री उशिरापर्यंत त्यांनी कोणतीही दिलगीरी व्यक्त केलेली नाही.”

Advertisement

सचिन पवार यांनी केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या, त्यात काहींनी शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर काहींनी शरद तांदळेंनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय. तसंच काही सोशल मीडियावरील युजर्सने शरद तांदळे यांना त्यांची भूमिका मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

हा आहे तो व्हिडिओ :

Advertisement


निंदकाचे घर असावे शेजारी !

सोमनाथ कन्नर यांनी या पोस्टवर म्हटलं आहे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे आत्मपरीक्षण करण्याचं तत्व वारकरी संप्रदायाला लागू पडत नाही वाटतं ? शरद तांदळेंच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांचा वाईट वाटतेय, चीड निर्माण होतेय, पण आतापर्यंत वारकरी संप्रदायात धर्माच्या नावाने चाललेली विचारांची भेसळ होत आहे व कीर्तन परंपरेचं खुलेआम बाजारीकरण होत असताना तेव्हा ती तळमळ का जाणवत नाही, हे गमतीशीर आहे. तांदळेंना वारकरी संप्रदायाचं महत्त्व माहीतच नाही, असं तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकता का ? पण त्यांनी जी टीका केली तसं संप्रदायात नाहीच, हे मात्र तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकत नाही.”

Advertisement

कोण आहेत शरद तांदळे ?

शरद तांदळे यांचं मूळ गाव बीडमधील वंजारवाडी हे आहे. वंजारवाडी ते थेट लंडन असा थक्क करणारा प्रवास त्यांनी केला आहे. ते स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. लंडन येथे त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2018 मध्ये प्रकाशित झालेली ‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीचं लेखन त्यांनी स्वतः केलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘द आंत्रप्रेन्यूअर’ हे पुस्तकही लिहिलं आहे. ते व्याख्याते म्हणूनही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement