कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने स्वयंशिस्त पाळा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा अन्यथा टाळेबंदी लावण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात दिला आहे.
पण राज्य सरकारने सगळीकडेच टाळेबंदी केली नाही. तर त्याऐवजी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाविषयक हे सर्व कडक निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास राज्य सरकारने टाळेबंदी अथवा कठोर निर्णय घेण्याचे अधिकार याआधीच स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध-
▪️ राज्यात सभा, समारंभांवर बंदी, विवाह समारंभाला फक्त 50 जणांना तर अंत्यविधीसाठी 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी
▪️ सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये 50 टक्के उपस्थितीस परवानगी, वर्क फ्रॉम होमवर भर देण्याची सूचना
▪️ सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेलांना 50 टक्के प्रवेश क्षमतेची मर्यादा
▪️ जिथे जिथे कोरोनाविषयक या सर्व नियमांचा भंग होताना दिसेल त्या आस्थापनांवर कोरोना आपत्ती संपेपर्यंत बंदी
▪️ राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एका तासात, एका दिवसात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल, ऑनलाईन दर्शनाचा पर्याय कसा उपलब्ध करून देता येईल इ. जाहीर करण्यात यावे व दैनंदिन नियोजन करावे.
नव्या आदेशात काय ?
सभा-समारंभांची कार्यालये, हॉटेल व चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालयांनी निर्बंधांचे पालन न केल्यास, कोरोनाविषयक शिस्त न पाळल्यास थेट कोरोना आपत्ती संपेपर्यंत ही आस्थापने बंद करण्यात येतील, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आता केंद्र सरकारने कोरोनाला आपत्ती म्हणून जाहीर केलं असून केंद्र सरकार जोपर्यंत ती अधिसूचना उठवत नाही तोपर्यंत निर्बंधांचे उल्लंघन करणारी आस्थापने बंद करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit