SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगण्याची नवी उमेद देणारे गायक आनंद शिंदेंचे प्रेरणादायक किस्से वाचाच!

महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या आवाजाने मराठी मनावर गारूड निर्माण केलं आहे. लोकगीते असू वा चित्रपटातील गाणी असोत याद्वारे आपल्या स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारे गायक आनंद शिंदे यांच्या आवाजावर अख्खा महाराष्ट्र ठेका धरत असतो. चला तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही किस्से..

तुम्हाला माहिती आहे का ? आनंद शिंदेंचे वडील प्रल्हाद शिंदे यांना आनंद शिंदे यांचा आवाज आवडत नव्हता. हे जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल.

Advertisement

मग प्रल्हाद शिंदेंना कुणाचा आवाज आवडायचा?

संगीत विश्वात आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे या जोडीने तुफान प्रसिद्धी व प्रेम मिळवले. यात आनंद शिंदेचा चाहता वर्ग मोठा होता. जरी असं असलं तरी आनंद यांच्यापेक्षा प्रल्हाद शिंदेना मिलिंद यांचाच आवाज आवडत असे. वडिलांना माझा आवाज कधीच आवडला नाही त्यांना मिलिंदचाच आवाज आवडायचा, असे ते सांगतात.

Advertisement

आनंद शिंदेनाही मिलिंदचाच आवाज आवडतो. मिलिंदचा आवाज म्हणजे वडिलांचाच जिवंत आवाज आहे, असं आनंद शिंदे सांगतात. मिलिंदने नेहमी रियाज करण्यात सातत्य ठेवलं तर ते सर्वांच्या पुढे जातील. गायन क्षेत्रात तो कुठेही त्याची चमक दाखवू शकतो. खूप काही करू शकतो, एवढी त्याच्या आवाजात जादू आहे, असं आनंद सांगतात.

रिक्षाही चालवली-

Advertisement

वडिल महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक होते. पण या क्षेत्रात पैसा फारसा मिळत नसायचा. वडिलांना आमच्या भविष्याची नेहमीच काळजी असायची व त्यासाठी वडील खूप कष्ट करायचे आणि म्हणायचे गाण्यात काही खरं नाही. गाणी गाणं हे खायाचं काम नाही. नोकरी कर. कामधंदा कर, असं वडील नेहमी म्हणायचे. त्यामुळे मी तबला वाजवायला शिकलो. त्यानंतर मी पुण्यात एका भावाकडे गेलो. तिथे वास्तव्यास असताना रिक्षा कशी चालवतात हे पाहिलं आणि हळूहळू शिकलो. काही काळ गेल्यावर माझ्याकडून एक छोटासा अपघात झाला अन् मी रिक्षा चालवणं बंद केलं, असं आनंद शिंदे सांगतात.

पोपटवाल्याचा बाप-

Advertisement

आमच्या वडिलांना आम्ही गाणं गाणं पसंत नव्हतं. ते म्हणायचे नोकरी करा, कामाला लागा आणि आपलं पोट भरा. पण आमची ‘जवा नवीन पोपट हा’ ही कॅसेट बाजारात आली आणि महाराष्ट्रभर गाण्यासोबतच आम्हीही गाजलो. या क्षणाने आम्हाला खूप काही घडवलं. यानंतर काही काळात आम्ही स्थिरस्थावर झालो. या गाण्याने तर इतकी प्रसिद्धी दिली की, कधी जर वडिलांना कुणी विचारलं तर ‘अरे त्या पोपटवाल्याचा बाप आहे मी’, असं ते अभिमानाने सांगायचे, असं सांगताना आनंद यांचे डोळे भरून आले.

वडील फकिर, गरजूंना मदत करणारे-

Advertisement

आनंद शिंदे व मिलिंद शिंदेंचे वडील एकदम फकिर माणूस होते. त्यांच्या खिशात पैसा कधीच टिकला नाही, उदार मनाच्या या माणसाला कुणी गरजवंत भेटला आणि त्यांना तो खरोखरच गरजू आहे असं वाटलं तर खिशात असतील नसतील तेवढे पैसे काढून द्यायचे. प्रसन्न चेहऱ्याने लोकांना ते नेहमी मदत करायचे. त्यांना मिळालेला पैसा खूप वेळा घरापर्यंत येतच नसायचा. त्यामुळे आला महिना कसाबसा ढकलावा लागायचा, असं गायक आनंद शिंदे सांगतात.

कामाला लागायची हौस, ती ही झाडू खात्यात..

Advertisement

आनंद शिंदे पुढे म्हटले की, त्यावेळी मी गायक होईल असं वाटलं नव्हतं. एकदा झालं असं की, माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे त्यावेळी मुंबई महापालिकेत झाडू खात्यात कामाला होते. त्यांचं पाहून मलाही झाडू खात्यात कामाला लागावं की काय, असं वाटायचं. कारण नोकरी जी करायची होती ती पालिकेची नोकरी भारी वाटायची. पण आयुष्याला इतका खास टर्न मिळत गेला आणि इथपर्यंतचा प्रवास कसा घडला हेदेखील कळलं नाही, असं ते म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement