यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता.
बाळ बोठे ज्या हॉटेलमध्ये लपला होता, त्या खोलीस बाहेरून कुलुप होते. हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठातील अँड. जनार्दन चंद्राप्पा याने बोठेस आश्रय दिला होता. तर अहमदनगर येथून महेश वसंतराव तनपुरे हा बाळ बोठेच्या संपर्कात होता.
रेखा जरे यांची हत्या प्रकरणात पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी 1500 पानांचे आरोपपत्र (दोषारोपपत्र) पारनेर न्यायालयात सादर केले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांना अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.
कोणी केली होती बोठेला मदत :
बोठे याने नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी केलेली आहे. तसेच त्याने तब्बल 16 विषयांमध्ये पदवी घेतलेली आहे. हैद्राबाद येथील उम्सानिया या विद्यापीठातून पदवी घेत असताना बोठेची ओळख जनार्दन आकलेशी झाली होती. यावेळी त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. भल्या भल्या गुन्हेगारांना आश्रय देणारा वकील म्हणून आकले प्रसिद्ध आहे. याच आकलेच्या सहाय्याने बोठे राहत होता.
कुणाची नावे येऊ शकतात समोर :
बोठे याने हैद्राबादला जाण्यापूर्वी कुणाकुणाची मदत घेतली, त्यांची नावे आता समोर येऊ शकतात. या प्रकरणात अजून काही नावे समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितली आहे.