SpreadIt News | Digital Newspaper

🐄 एक मार्च पासून खरच 100 रुपये दराने दूध विकले जाणार का?

0

देशात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून त्यातच महागाईचा देखील भडका उडाला आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसचा समावेश आहे. या तीनही गोष्टींच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून सरकारप्रती रोष निर्माण होत आहे. मात्र आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडण्याची शक्यता आहे. ती म्हणजे दुध होय.

अलीकडील काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती बघून शेतकऱ्यांनी देखील दूध महाग विकण्याचे ठरवले आहे. जर सर्वसामान्य व्यक्ती महाग असलेले पेट्रोल आणि डिझेल करू शकतो, तर जीवनावश्यक असलेले दूध 100 रुपये प्रतिलिटर दराने का खरेदी करू शकत नाही, असा शेतकऱ्यांचा युक्तिवाद आहे. याच पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी 100 रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले पाहिजे, या भूमिकेचे समर्थन करणारे देखील अनेकजण आहेत. त्यामुळे खरंच आता एक मार्चपासून देशात 100 रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले जाणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisement

कोणी घेतला निर्णय : दूध 100 रुपये प्रतिलिटर दराने विकावे असा निर्णय हरियाणा राज्यातील हिसारमधील खाप पंचायतीत घेण्यात आला. केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे आणि पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमती, याचा निषेध करण्यासाठी ही खाप पंचायत आयोजित करण्यात आली होती. जर नागरिक शंभर रुपये दराने पेट्रोल, डिझेल खरेदी करू शकतात, घरगुती स्वयंपाकासाठी महागडा गॅस खरेदी करू शकतात, तर जीवनावश्यक असलेले दूध शंभर रुपये लिटर दराने का घेऊ शकत नाही, असा या पंचायतीत सूर उमटला.

त्यामुळे शंभर रुपये दराने दूध विकण्यासाठी 1 मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे या पंचायतीमध्ये सांगण्यात आले होते. 1 मार्चपासून शंभर रुपये प्रतिलिटर दराने दूध हे तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या नागरिकांसाठी किंवा गावाबाहेरच्या नागरिकांसाठी तसेच डेअरीवाल्यांसाठी विकले जाणार आहे. गावातल्या गावामध्ये दूध हे जुन्या किमतीतच विकले जाणार असून नवीन भाववाढ फक्त गावाबाहेरील नागरिकांसाठी आणि डेअरी उत्पादकांसाठी असणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

शंभर रुपये लिटर मिळणार दूध : दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय हा हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील कसबे या बाजार समितीमध्ये सतरोल खाप पंचायती झाल्यावर घेण्यात आला. या पंचायतीतील एका प्रतिनिधीने सांगितले की, आम्ही दूध हे 100 रुपये प्रतिलिटर या हिशोबाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व दुग्ध व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपले दूध सरकारी को-ऑपरेटिव्ह सोसायटीला शंभर रुपये प्रतिलिटर या दराने विकावे.

सध्या दिल्ली-हरियाणाच्या सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मोठे आंदोलन उभारले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या भारतीय किसान युनियनचे अंबाला जिल्हाध्यक्ष मलकित सिंह यांनी मागे याविषयी विधान केले होते. ते म्हणाले होते की, 1 मार्चपासून देशभरात शेतकरी हे दुधाच्या दरांमध्ये 50 रुपयांनी वाढ करतील. म्हणजेच एक मार्चपासून दुध हे शंभर रुपये प्रतिलिटर विकले जाईल. याचबरोबर मलकीत सिंग यांनी असे स्पष्ट केले होते की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून शेतकऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारने हे कृषी कायदे मागे घेतले नाही तर दुधाचे दर वाढतीलच परंतु त्यासोबतच येणाऱ्या काळात आम्ही भाजीपाल्यांच्या दरामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ करणार आहोत. असेही मलकित सिंह यांनी म्हटले आहे.

Advertisement