पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे.
आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे. देशात गॅस सिलेंडरच्या किंमतीत फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा भाव होत आहे. 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित गॅस सिलेंडर हे 25 रुपयांचे महागल होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना 694 रुपयांच्या सिलेंडरसाठी तब्बल 719 रुपये मोजावे लागत होते.
2020 चा विचार केला असता 2 डिसेंबर 2020 मध्येही 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती. गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्य गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे.
लॉकडाउनपासून गॅसच्या दरात सुरू झालेली वाढ अजूनही थांबलेली नाही. एका बाजूला महागाई आणि बहुतांश क्षेत्रातील मंदीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या भारतीयांना पेट्रोलसह गॅस दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत